पुरंदर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक लेखक :- प्रा .एन. आर . जगताप / मुख्य संपादक चावडी न्यूज नोकरी प्रत्येक ...
पुरंदर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक
नोकरी प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. वय वर्ष 18 ते 30 या वयोगटातील तरुणांमध्ये नोकरी या विषयाबाबत मोठ्या प्रमाणात चिंता , चर्चा आणि मोठ्या प्रमाणात नोकरीचा शोध ह्या गोष्टी ओघाने आल्याच , पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं परंतु कालांतराने काळ बदलला आणि उत्तम नोकरी, दुय्यम व्यापार, कनिष्ठ शेती असा प्रकार रूढ झाला आणि नोकरी मिळवणं हे एकमेव आयुष्याचे ध्येय असल्याच मत प्रत्येक तरुणाच्या आयुष्यच ध्येय बनत चालले आहे.नोकरी हेच प्रत्येक तरुणाच स्वप्न बनत चालल आहे.
सध्या तर बघितलं तर तब्बल दोन वर्षांहून अधिक काळापासून ठाण मांडून बसलेला कोरोना त्यानंतर अनावधानाने आलेला लॉकडाऊन याच्या परिणाम स्वरूप संपूर्ण देशातील व महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . बेरोजगारी ही सध्या पुरंदर तालुक्यालाही सर्वात मोठी भेडसावणारी समस्या बनत चालली आहे. पुरंदर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुरंदर हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या कष्टाने येथील बळीराजा आपली शेती करतो आहे. मात्र शेतीचे उत्पन्न हे अशाश्वत आहे मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन जरी झाले तरी त्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळेल की नाही हे शंकास्पद असते. या साशंकतेने हा शेतीचा जुगार पुरंदरचा बळीराजा खेळतो आहे . वर्षानुवर्षे तो अशा पद्धतीने कष्टाने शेती करतो आहे . मात्र असं असलं तरी पुरंदर तालुक्यातील तरुणांना नोकरीची आस मात्र लागलेली असते कारण नोकरी आहे तरच छोकरी आहे, असा प्रकार रूढ होत चालला आहे . बहुतांशी लग्नाळू तरुणांना नोकरी ही गरजेची असते कारण आजकाल असेच रूढ झालेल आहे. की तुमच्याकडे शेती हवी आणि नोकरी पण हवीच या दोन गोष्टींसाठी पुरंदर तालुक्यातील तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतो. मात्र तालुक्यातील रोजगार निर्मिती ही अतिशय अल्प आहे.
तालुक्यातील जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने येणाऱ्या उद्योगांची संख्या अनेक वर्षांपासून घटलेली आहे सध्या जे आहेत ते उद्योग बंद पडतात, नवीन कंपन्या येत नाहीत यामुळे तालुक्यातील तरुणांना पुण्यामध्ये रोज अप-डाऊन करावे लागते मात्र रोज येण्या-जाण्याचा खर्च आणि मिळणारा पगार यामध्ये जर बघितलं तर आमदनी अठन्नी खर्चा रूपया अशी परिस्थिती तालुक्यातील तरुणांची बनलेले आहे. मात्र नोकरी करायचीच आहे या गोष्टीसाठी प्रत्येक तरुण हा रात्रं-दिवस राबतो आहे परंतु त्याला आपल्याला मिळणारा मोबदला हा अतिशय अल्प आहे जेजुरी एमआयडीसी मध्ये कंत्राटी कामगारांची संख्या बहुसंख्य आहे. यातही जेजुरी एमआयडीसी मध्ये परप्रांतीयांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
नीरा येथील एका मोठ्या कंपनीमध्ये भूमिपुत्रांना डावलले जाते यासाठी नुकतेच आंदोलन देखील केल गेल आणि भूमिपुत्रांकडून अर्ज मागवले गेले यानंतर आलेल्या अर्जांची संख्या ही देखील चिंता वाढवणारी आहे. या ठिकाणी तब्बल आठशेहून अधिक तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत.
एकंदरीतच बघितलं तर पुरंदर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे ही अत्यंत गरजेचे आहे या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील उद्योगांना व व्यवसायांना चालना देणे गरजेचे आहे तालुक्यात लघुउद्योग, कुटीर उद्योग वाढीस लागणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय सोयी सुविधा शासकीय अनुदान ,शासकीय कर्ज पुरवठा होण देखील तितकच गरजेचे आहे. बहुतांश उद्योग व्यवसाय हे लॉकडाउन मुळे प्रचंड अडचणीत आलेले आहे. आर्थिक तोटा सहन करत आणि उद्योग सुरू आहेत मात्र तसं बघितलं तर या उद्योगांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न होणे तितकेच गरजेचे आहे .
नोकरी अभावी- रोजगारा अभावी तालुक्यातील तरुणांच स्थलांतर हे अपरिहार्य आहे आणि तालुक्यातला स्थलांतरित झालेला तरुण हा दुसऱ्या ठिकाणी जातो यामुळे तालुक्यातील अर्थव्यस्थेवरती देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे . एकंदरीतच आपण जर बघितलं तर पुरंदर तालुक्यामध्ये बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे चौकाचौकात बसणाऱ्या तरुणांच्या जवळ असलेली पदव्यांची प्रमाणपत्रे केवळ शोसाठी आहेत का घरामध्ये फोटो बनवून ठेवण्यासाठी आहेत का? असा देखील आता उद्विग्नपणे तरुणांकडून सवाल उपस्थित केला जातो आहे .
या सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडे शासन प्रशासन कोणाचेही लक्ष जात नाही या बाबतीतही आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारी नोकरी मिळणं हे तर आता दुरापास्त झाले आहे कारण सरकारी नोकरीच्या जाहिराती बघितल्या नंतर जाहिरातीतील भरती साठीच्या जागा आणि दाखल होणारे अर्ज यांच जर प्रमाण बघितलं तर त्यामध्ये कोणाच्या वाट्याला नोकरी येणार हा देखील मोठा प्रश्न आहेच .
यासाठी सर्वात गरजेच आहे ते पुरंदर तालुक्यातील नैसर्गिक उपलब्धतेवर आधारित उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. पुरंदर हे फळांच आगार म्हणून ओळखले जात सीताफळ ,डाळिंब, अंजीर,पेरु या फळांसाठी पुरंदर ओळखला जातो या फळांवर प्रक्रिया करणाऱ्या फळप्रक्रिया उद्योग यांना जर मोठ्या प्रमाणात चालना मिळाली यासोबतच फळांच्या वरती आधारित साठवण क्षमता असणारे उद्योग, वाहतूक व्यवस्था असणारे उद्योग, फळ विक्री प्रक्रिया उद्योगांचा प्रमाण वाढायला हवं तरच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होईल पुरंदरमध्ये पर्यटनासाठी देखील मोठी संधी आहे मात्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पर्यटनाचा विकास होत नाही पर्यटन विकसामुळे तालुक्यातील बहुसंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
एकंदरीतच जर आपण बघितलं तर तालुक्यातील उपलब्ध नैसर्गिक सोयी सुविधांवर आधारित उद्योगधंद्यांना चालना मिळणे अत्यंत गरजेचे आहे तरच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे बेरोजगारी ही पुरंदर मधील एक मोठी सामाजिक समस्या बनत चालली आहे. याचा परिणाम हा अनेक गोष्टींवरती होतो एखादा तरुण उच्चविद्याविभूषित असेल आणि तो तरुण बेरोजगार राहत असेल तर त्यातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही नोकरी मिळत नाही म्हणून अनेक सुशिक्षित तरुण हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील तालुक्यातील उच्चविद्याविभूषित तरूण हे अवैध धंद्यात कडे आणि गुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता आहे.
थोडक्यात तालुक्यातील घ्या बेरोजगारीच्या समस्येवर तात्काळ उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.
COMMENTS